
प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते समुद्र किनारी आपले घरकुल असावे, पण ते आपल्या खिशाला परवडणारे नाही अशी ही खंत देखील त्याच्या मनामध्ये असते. ही खंत उरी घेऊनच तो झोपी जातो. आयुष्यातले काही क्षण आपण स्वप्नामध्ये जगत असल्यासारखे जगतो. असे काही स्वप्नातले क्षण मला अनुभवायला मिळाले ते रत्नागिरीसारख्या निसर्गरम्य ठिकाणी भाट्ये बीचवर वसलेल्या रत्नसागर या रिसॉर्टवर. माझा तर अनुभव अप्रतिम होता. प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घ्यावा असा. रत्नागिरीचे खरे सौंर्द्य दडलेले आहे ते तिथल्या निखळ आणि स्वच्छ समुद्रामध्ये, अशा ठिकाणी आपण तास न तास रमतो, पण आपल्याला जर समुद्र किनारी काही दिवस राहण्यास मिळत असेल तर सामान्य माणूस ती संधी कधीच गमावणार नाही. आम्ही जिथे थांबलो होतो त्या रत्नसागर रिसॉर्टवर फक्त समुद्राचे सौंर्द्यच नाही, तर मस्त अशी पॉलीश्ड लाकडापासून बनवलेली ठुमदार घरे आपले मन आकर्षित करुन मनात केव्हा घर करुन जातात तेच कळत नाही. मुंबई सारख्या सिमेंटच्या जंगलापासून दूर कुठे तरी नक्कीच आपण एका इको फ्रेंन्डली वातावरणात राहण्याचा आनंद घेतोय असा विचार मनात डोकावूनच जातो. अगदी मानसिक समाधान. पूर्णपणे रिलॅक्स मिळेल असे वातावरण. एकंदर खूप खूप मजा आली.
मुंबईहून किमान सात तास प्रवास करुन आम्हाला कंटाळा आला होता. गेल्या गेल्या रुम वर जाऊन झोपण्याचा विचार केला होता. पण तिथे एन्ट्री केल्यावर फक्त शांतपणे सगळे काही बघतच राहिलो. समुद्र तर रात्रीच्या अंधारामुळे पाहता आला नाही पण समुद्राच्या खळाळणाऱ्या लाटांच्या आवाजाने आम्ही मनाने किनाऱ्यावर पोहोचलो. सगळं वातावरण नैसर्गिक आणि उत्साह देणारं तर होतंच पण मनाला आल्हादायक अनुभव देणारं असं होतं. रत्नसागर रिसॉर्टवर मला मालवणी जेवणाचा आस्वाद अगदी मनसोक्त घेता आला. कोंबडी वडे आणि सोबतीला कोकम सरबत अजून काय हवंय जिभेला..! लहान मुलांसाठी मस्त मजेशीर असे समुद्र किनारी गार्डन आहे, तिथल्या झोक्यांचा आनंद तर लाजवाब होता. मला देखील झोक्यावर बसण्याचा मोह आवरला नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे समुद्र्किनाऱ्यावर डॉल्फीन माशांचे दर्शनही आम्हांला सकाळी घडलं.
हा सागरी किनारा...ओला सुगंध वारा... या गाण्याची प्रचिती घ्यायची असेल तर एकदा नक्कीच भाट्ये बीचला भेट द्या. शेवटी काय...‘कोकण आपलाच आसा’..!!!
खुप छान लिहतेस तु...!!!
ReplyDeleteहा अनुभव वाचल्यामुळे मला पुन्हा रत्नागिरी जावसं वाटतयं...