Thursday, June 22, 2017

निसर्गांच्या कुशीत भंडारदरा ...

निसर्गांच्या कुशीत भंडारदरा ...

येरे येरे पावसा तुला देतो पैसा अशी काहीशी अवस्था आपली झाली आहे... जून महिना अर्धा संपत आला तरी पावसाने हवा तसा जोर धरलेला नाही, या पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतो. स्पेशल पावसाळी सहल कुठे कुठे जायचे याचे प्लॅनिंग ऑफिस, आपला आवडता कट्टा, वॉट्सऍप ग्रुप सगळीकडे सुरु झाले आहेत. अशा वेळी आता नक्की जायचं कुठे चांगला पर्याय नेहमीच आपण शोधत असतो. लोणावळा, खंडाळा, माळशेज, माथेरान, निरनिराळे धबधबे अशा विविध ठिकांणाची माहिती आपण गोळा करायला लागलो. असेच एक अविस्मरणीय स्थळ भंडारदरा म्हणजे निसर्गाच्या कुशीत जाण्याचा अनुभव आहे. या पावसाळ्यात नक्कीच जाऊन या...

निसर्गाची बदलती रुपं अगदीच जवळून पाहायची असेल तर सह्याद्री डोंगरदऱ्यांच्या कुशीत गेलेच पाहिजे. सभोवताली फक्त आणि फक्त निसर्ग आहे, कानांमध्ये वाऱ्याची झुळुक, हवेत गारवा, क्षणात काळे, क्षणात शुभ्र निळे होणारे आणि प्रवाहाच्या दिशेने जाणारे ढग पाहताना गम्मतच वाटते. स्वर्ग कसा असतो हे कोणालाच माहित नसते पण निसर्गाचे सौर्द्य पाहिले की आपण स्वर्गात आहोत की काय असं मनात नक्कीच येऊन जाते. असाच एक स्वर्ग आहे जो आपण या पावसाळ्यामध्ये पाहण्याचा प्लॅन करु शकतो. रिमझिम पाऊस, दाट धुकं, शुद्ध थंड हवा, हवेत दरवळणारा मातीचा सुंगध, सगळीकडे हिरवेगार गालिचे, उंच उंच डोंगरदऱ्या, मनसोक्त कोसळणारा धबधबा आहे ना सुंदर वर्णन... मन सैरावैरा पळत असेल तर नक्कीच अशा निसर्गाच्या सानिध्यात शांत होईल. चला तर मग भंडारदरा ....

भंडारदरा आहे कुठे ?
निसर्गसौंदर्यांसाठी प्रसिद्ध असलेले गाव भंडारदरा. हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात. भंडारदरा- शेंडी हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव. पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू  भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा आहेत. येथे पाहण्यासाठी असणारे स्थळ कळसुबाई मंदिर, पांजरे बेट, अलंग, मलंग, कुलंग गड, उंबरदारा व्ह्युव पॉईंट, कोकणकडा, घाटनदेवी व्ह्युव पॉईंट, सांदन दरी, रिव्हर्स वॉटर फॉल, अमृतेश्वर मंदिर, नान्ही वॉटर फॉल, विल्सन डॅम, कळसुबाई शिखर, रत्नागड, रंधा फॉल, रतनवाडी, घाटघर असे पर्याय आहेतच. या सर्व स्थळांवर पावसाळ्यात जाऊन मनसोक्त आनंद घेऊ शकतो. येथे सर्व स्थळ तुम्हाला माहित नसेल तर तेथील गावकरींना हा तुमचा गाईड म्हणून घेऊ शकता. त्यांच्याकडे वनपरिक्षेत्र वन्यजीव भंडारदरा कार्यालय, गाईड ओळखपत्र क्रमांक पहावा.
  
शेंडे गाव - एकदम खास स्थळ म्हणजे रात्रीच्या शांततेच काजवे पाहण्यासाठी भंडारदरा येथील शेंडे गाव प्रसिद्ध आहे. मुंबईकरांना काजव्यांचे आकर्षण कायमच असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पाऊस सुरुवात झाल्यावर जाऊ शकतो. पावसाळ्यात चांदण्या आणि चंद्र यांचं दर्शन दुर्मिळ असते. ढगांच्या आड त्यांचे दर्शन कमीच मिळते. यावेळी या काजव्यांची रोषणाई अधिक उठून दिसते. पूर्ण झाडावर विजेचा लखलखाट दिसतो. काजव्याचा मुख्य उद्देश हा आपल्या जोडीदाराला आकर्षित करुण घेणं आणि आपलं अन्न शोधणं हा असतो. आपल्या जोडीदारासोबत कायमस्वरुपी लक्षात राहावं असं काही तरी पाहायचे असेल तर नक्कीच जा काजवे दर्शन करायला. मे आणि जून महिन्यात या काजव्यांचे दर्शन होते. दिवसभर भटकंती करुन रात्री काजव्याचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर निघू शकता.       
   
कळसुबाई शिखर –
ट्रेकींगचा विचार असेल तर हा पर्यांय आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर “कळसुबाई”. कळसुबाई शिखराची उंची १६४६ किमी. पावसाळ्यातील ट्रेकिंगचा उत्तम पर्याय आणि गिर्यारोहकांचे पावसाळ्यातील आवडते ठिकाण. ढगांमध्ये हरवायचं असेल, हवेत उडायचं असेल, एक थरार, एक नवा अनुभव घ्यायचा असेल, काहीतरी साहसी आणि कायम लक्षात राहील असं करायचं असेल तर बेस्ट पर्याय हा आहे. हे शिखर भंडाऱ्यापासून सहा किमी अंतरावर आहे. बरी या गावातून या शिखरावर चढण्यासाठी सुरवात करावी लागते. मुंबईपासून १८० किमी आणि पुण्यापासून ८० किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

कळसुबाई ते हरिश्चंद्रगड अभयारण्य-
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ते हरिश्चंद्रगड पर्यंत पसरलेली निसर्गरम्यविलोभनीयहिरव्यागर्द वनराईचा गिरी शिखरांनी वेढलेल्या प्रवरामुळा ह्या नद्यांचे उगमस्थान असलेला जंगलपट्टा म्हणजेच कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य.

विल्सन फॉल -
पावसाळा म्हटले की धबधब्याचे आकर्षण सगळ्यांनाच असते. हा धबधबा ही तितकाच सुंदर आणि आकर्षक आहे. मोठा गोल आकाराचा असा गोलाकार धबधबा आहे. छत्रीसारख्या आकारामुळे त्याला अम्ब्रेला फॉल असेही बोलतात.

रंधा फॉल -
शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रंधा या गावात रंधा फॉल असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजूने अजून एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे. या धबधब्याच्या जवळच एक देवीचे मंदिर आहे पावसाळ्यात ते पूर्णपणे पाण्याखाली जाते. पाहण्यासाठी छान पण भितीदायक असलेला धबधबा भंडाराचे मोठे आकर्षण बिंदू आहे.  

रतनवाडी-
बोटिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर भंडारदऱ्याहून रतनवाडी जाता येते. रतनवाडी येथे अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदीर आहे. या मंदिरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असून त्यात मुख्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहेपावसाळ्यात हे शिवलिंग पूर्णत: पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परिसरात अनेक धबधबे असून गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉलहा विशेष लोकप्रिय आहे.

घाटघर -
शेंडी गावापासून २२ किमी अंतरावर घाटघर गाव. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास निसर्गाच्या कुशीत जाण्यासारखा आहे. येथे कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असून इथून कोकण आणि सह्याद्री पर्वताचे आकर्षण आहे. हिरवाईने नटलेला परिसर, धबधबा, धुक्यात हरवलेला रस्ता, सगळं मन प्रसन्न करणारे आहे. घाटघरला येथे खूप पाऊस पडतो म्हणून यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हणतात.

जेवणाची सोय- अमृतेश्वर मध्ये छोटी छोटी हॉटेल्स उपलब्ध आहेत. घरगुती आणि रुचकर जेवण मिळते. नगरची शेव भाजी आणि वाग्यांचे भरीत, गावठी कोंबडी यांचा मनसोक्त आनंद घेता येतो. तसेच एमटीडीसीचे हॉटेल राहण्यासाठी भंडारदरा येथे आहे.

अर्चना सोंडे – ८१०८१०५२२९ 
More Photos 





Thursday, June 15, 2017

शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात “दिवेआगर”


शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात “दिवेआगर”

सध्या उकाडयाने खूप हैराण झाले आहेत सगळेच, गावाकडे गेलेली मंडळी आता परतीच्या वाटेवर आहेत. खूप उन आहे म्हणून काही लोकांनी फिरायला जाण्यापेक्षा घरीच थांबणे पसंत केले आहे. गाव नसलेल्यांना तर काही ऑप्शनच नसतो घरी राहण्याव्यतिरिक्त, तरी सुद्धा काही भटकंती काही प्लॅन करायचा असेल तर मुंबई जवळची उत्तम जागा ‘दिवेआगर’, अगदी स्वतःच्या गावी असल्याचा फिल घ्यायचा असेल तरी अजूनही वेळ गेली नाही नक्की जाऊन या...
काय आहे दिवेआगर -
’दिवेआगर’चा सुर्यास्त हा अप्रतिम असतो. “दिवेआगर” हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातले एक गाव. छोटुसं ३,८४० लोकसंख्या असलेले गाव. या गावाला पर्यटन स्थळ म्हणून ओळख मिळाली ती येथे असणाऱ्या स्वयंभू सोन्याच्या गणपती मंदिरामुळे. या गणपती मंदिराची स्टोरी तर अनोखीच आहे. दिवेआगरचे मुख्य आकर्षण म्हणजे सुवर्णगणेश मंदिर, या मंदिराचा इतिहास म्हणजे, मंदिराजवळ नारळी-पोफळीच्या बागेत जमिनीखाली खणताना एक तांब्याच्या पेटीत गणेशाचा सोन्याचा मुखवटा सापडला. हा मुखवटा गणेशमंदिराच्या विश्वस्तांकडे सोपविण्यात आला. नंतर त्याची स्थापना मंदिरामध्ये करण्यात आली. काही वर्षापूर्वी या सोन्याच्या मुखवट्याची चोरी झाली. पण आता तशीच सोन्याची गणेश मुखवटा असलेली मूर्ती स्थापित केली आहे. अतिशय रेखीव असणारे रुपनारायण मंदिर आणि तेथे असणारे पाण्याचे मोठे कुंड पाहण्यासारखे आहे. शांत समुद्रकिनारा सगळ्यांचा आवडता असतो. हीच शांतता येथील स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यावर आपल्याला मिळते.
गणपती मंदिर

दिवेआगरच्या इतिहासात डोकावतांना...
फारशी सन शुहुर मेरा- १००० ते १००८ या काळातील बुर्हाण निजामशहा तिसरा याने केलेल्या या शिलालेखात ८ ओळी अरबी तर १६ ओळी मराठी भाषेत आहेत. यात गावाचा उल्लेख ’दिवे’ असा आहे. दक्षिण श्रीवर्धन परगणा, पश्चिमेस समुद्र तर उत्तरेस परगणे दण्डा, वाटेत दिघी तरीचा मार्ग अशा दिवेआगरच्या चतुःसीमा या निजामशाही शिलालेखात सांगितल्या आहेत.
दिवेआगर इतिहास

मुंबई ते दिवेआगर प्रवास
मुंबईपासून दिवेआगर ४ तास, १९० किलोमीटर. मुंबई-पनवेल-पेण-वडखळ-दिवेआगर असा प्रवास. कारने किंवा बाईकने लॉन्ग ड्राईव्ह करायचा असेल तर हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा. शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवेआगर हे तिन्ही ठिकाण जवळ जवळ असल्याने येथे जाण्याची मज्जा काही औरच आहे.

राहण्याची खाण्याची सोय
बोर्ली गावानंतर रस्ता सुरु होतो तो दिवेआगरचा मग दिवेआगर कोळीवाडा, ग्रामपंचायत दिवेआगर, येथील वस्तीतील छोटी छोटी घरे, तसेच पर्यटक वाढत असल्याने काही हॉटेल्स आहेत. राहण्याची आणि खाण्याची घरगुती सोय असे प्रत्येक घराबाहेरील मोठे बोर्ड्स लक्ष वेधून घेतात. आमचे लक्ष वेधून घेतले ते, आमच्या अतिथीसाठी...‘धनश्री कॉटेज-निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची व जेवणाची उत्तम सोय’ या ओळींनी. तुम्हाला स्वतःच्या गावी आल्याचा फिल घ्यायचा असेल तर घरगुती सोयीसाठी प्रसिध्द असणारे, अतिशय मनमिळाऊ आणि आपण आपल्या हक्काच्या घरी आहोत अशी काळजी घेणारे कृष्णकांत तोडणकर यांच्या घनश्री कॉटेजमध्ये नक्कीच जाऊ शकतो. तिथला वैभव नावाचा मुलगा २३ वर्षाचा होता. येणाऱ्या पाहुण्याची आपुलकीने काळजी घेण्याची त्याची धडपड आश्चर्य करणारी होती. छोटासा वैभव जेवण बनविण्यात सुगरण आहे म्हटलं तरी चालेल. त्याच्या हातचे चिकन, मासे, सुक्या मच्छीचे कालवण यावर ताव मारताना फक्त “अरे वैभव मस्त झालंय” असं म्हटलं तरी थोडासा लाजून थॅक्स म्हणणारा वैभव खूपच गोड वाटतो. आपण त्याच्या घरातील एक आहोत अशीच आपली आपुलकीने काळजी घेतली जाते. त्यामुळे आपण आपल्या गावीच आलो असल्याचा फिल येतो.
आमच्या अतिथीसाठी...‘धनश्री कॉटेज-निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची व जेवणाची उत्तम सोय’ 

“दिवेआगर पासून जवळच कुठे भटकंती करायची असेल तर हरीहरेश्वर, श्रीवर्धन तसेच काही तासांच्या अंतरावर असणारे मुरुड जंजिरा ही फिरता येईल. तसेच किनाऱ्यालगत असणारे स्पोर्ट्स राईड ही करु शकतो. चला तर मग एक गावाकडची मज्जा अनुभवायला दिवेआगर जाऊया....
Divegara - Dhanashri Cottage -
Contact - Krishnakant Todakar - 9272722818

More Pics : 






अर्चना सोंडे
८१०८१०५२२९